बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी येथे भगवा ध्वज फकवल्या प्रकरणी शिवसेनेचे सुनील शिंत्रे, भाजपचे संग्राम सिंह कुपेकर वकील संतोष मळवीकर आणि अर्जुन जत्ती यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात न्यायालयीन प्रक्रियेसाठी दोघेही नेते बेळगावात उपस्थित होते. जामीन मंजुरीच्या घोषणेनंतर त्यांनी याबाबत सीमा बांधवांच्या व्यथांवर चर्चा केली. तेलंगणाचा महाराष्ट्राचा सीमाप्रश्न सुटतो तर कर्नाटकचा का नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच सीमाभागात कन्नड सक्ती करणे चुकीचे याला आमचा विरोध राहील. प्रसंगी आंदोलन देखील छेडण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी महाराष्ट्र सदैव सज्ज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भव्य आंदोलन छेडण्यात आम्ही सहभागी होऊ असे त्यांनी सांगितले.
महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी लाल – पिवळा कन्नड ध्वज फडकवल्याच्या निषेधार्थ कोनेवाडी (ता. जि. बेळगाव) येथे भगवा ध्वज फडकावून ‘जय महाराष्ट्र अशी घोषणा देऊन मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातील ५ जणांविरुद्ध न्यायालयाने वॉरंट जारी केला होता. सुनील शिंत्रे आणि संग्रामसिंह कुपेकर हे चौथे जेएमएफसी न्यायालयात हजर झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. चार वर्षांपूर्वी बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड संघटनांकडून बेकायदेशीररित्या लाल-पिवळा ध्वज फडकवण्यात आला. सदर घटनेचा त्यावेळी मराठी भाषिकांकडून जोरदार निषेध करण्यात आला होता. त्यामुळे वातावरण मोठ्या प्रमाणात तापले होते.