बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथे झालेल्या काँग्रेसच्या सभेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हात उगारल्याने नाराज होत सरकारकडे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करून खळबळ माजवलेले आणि बेळगावमध्ये अधिककाळ सेवा बजावलेले धारवाडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एन. व्ही. बरमनी यांची बेळगावच्या कायदा – सुव्यवस्था उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उपायुक्त रोहन जगदीश यांच्या बदलीनंतर आज सरकारने एन. व्ही. बरमनी यांची बेळगावच्या कायदा सुव्यवस्था पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्याचा आदेश दिला आहे.

बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी हात उभारल्यानंतर ते चर्चेत आले होते आणि त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. मात्र राज्य सरकार त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर, ते पुन्हा सेवेत रुजू झाले.

यापूर्वीही एन. व्ही. बरमनी यांनी बेळगाव शहरात अनेकदा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. मार्केट पोलीस निरीक्षक, मार्केट उपविभाग एसीपी या अनेक पदावर त्यांनी बेळगावात काम केले होते .आता पुन्हा बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्था उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.