• आपले सरकार विकासाभिमुख असल्याचे यापेक्षा मोठे प्रमाण काय हवे? : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सवाल
  • भाजपच्या अपप्रचाराला जनतेच्या विकासानेच उत्तर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

विजयपूर / दिपक शिंत्रे

विजयपूर जिल्ह्याच्या इंडी तालुक्यात एकाच दिवशी ४५५९ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केल्याचे सांगत, “आपले सरकार विकासाभिमुख आहे, याचे हेच मोठे उदाहरण आहे,” असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

विजयपूर जिल्ह्याच्या इंडी तालुक्यात आज आयोजित कार्यक्रमात, ‘शक्ती’ योजनेअंतर्गत महिलांनी ५०० कोटी वेळा मोफत प्रवास केल्याच्या निमित्ताने, केएसआरटीसीच्या बसला पूजन करून महिला प्रवाशांना मोफत तिकिटांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन करण्यात आले तसेच लिंबू विकास मंडळाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमात ४१५७ कोटी रुपये किंमतीच्या कामांचे भूमिपूजन व ४०१ कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. “भाजपने खुलेपणाने चर्चेला यावे. आमच्या सरकारच्या आणि भाजप सरकारच्या विकासकामांची नोंदी घेऊन जनतेसमोर चर्चा करूया. निर्णय जनतेला करू द्या,” असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले.

“विजयपूर जिल्हा पूर्वी कसा होता? काँग्रेसच्या मागील सरकारांनी काय विकास केला हे लोकांनी पाहावे. विजयपूरमध्ये सिंचनाच्या माध्यमातून भरपूर प्रगती झाली आहे. पूर्वी दुष्काळग्रस्त असलेल्या या भागाला हिरवेगार करण्याचे काम आम्ही केले आहे,” असे त्यांनी सांगितले.

“पूर्वी दुष्काळ पडल्यावर लोक लिंबाची झाडं तोडून टाकायचे. त्या काळात मी इंडीत आलो होतो आणि शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. आज त्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी लिंबू विकास मंडळाच्या लोगोचे अनावरण करत आहे. हीच काँग्रेसची परंपरा आहे — जे बोलतो ते करतो,” असेही त्यांनी सांगितले.

भाजप आणि जेडीएस दोघेही सरकारकडे पैसे नाहीत असा अपप्रचार करीत आहेत, म्हणून जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यांच्या अपप्रचाराला आम्ही विकास व जनकल्याणाच्या कार्यक्रमांनी उत्तर देत आहोत,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

“५०० कोटी वेळा महिलांचा मोफत प्रवास, १.२३ कोटी कुटुंबांना गृहलक्ष्मी योजनेतून लाभ, १.६४ कोटी घरांना २०० युनिट मोफत वीज, अन्नभाग्य आणि युवक निधी योजनांद्वारे कोट्यवधी कर्नाटकरांना आधार मिळालेला आहे – हे जर विकास नाही तर मग काय?” असे विचारत, “८३ हजार कोटी रुपये केवळ विकासकामांसाठी खर्च केले आहेत, आणि हे आमच्या विकासाभिमुख कारभाराचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे भाजप-जेडीएसच्या खोट्या आरोपांवर विश्वास ठेवू नका. जनतेच्या डोळ्यासमोर उभ्या असलेल्या विकासयोजनाच भाजपच्या खोटेपणाला उत्तर द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

इंडीचे आमदार यशवंतरायगौडा पाटील यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “शासनाकडून निधी आणून आपल्या मतदारसंघाचा विकास कसा करायचा, याबाबत ते अतिशय प्रामाणिक आणि चाणाक्ष आहेत. आमचे सरकार सर्वांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.”

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार यशवंतरायगौडा पाटील होते. यावेळी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, मंत्री एच. सी.  महादेवप्पा, दिनेश गुंडूराव, एम.बी. पाटील, एच.के. पाटील, शिवानंद एस. पाटील, शरण प्रकाश पाटील यांच्यासह अनेक आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.