रामनगर / वार्ताहर
गोवा-बेळगाव महामार्गावरील अनमोड घाटातील गोवा हद्दीत असणारा डांबरी रस्ता शनिवारी पहाटे पावसामुळे खचल्याने अनमोड घाट मार्गे छोटी वाहने तसेच बस वगळता इतर वाहनांना बंद झाला आहे. सध्या येथे युद्धपातळीवर काम चालू असून सध्या खचलेला रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. तर खचलेल्या रस्त्याच्या वरच्या बाजूनेही जेसीबीच्या साह्याने रस्ता रुंद करण्यात आला आहे. रस्त्याच्या खालील बाजूने संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून, या कामासाठी साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातून गोव्याला जाण्यासाठी सर्व वाहनांना अनमोड घाट मार्ग हा सर्व दृष्टीने सोयीस्कर तसेच जवळचा ठरत होता. पण महामार्गाचे काम सुरू केल्यापासून अनमोड मार्गाला जणू ग्रहणच लागल्याचे पाहावयास मिळत आहे.
इतकी वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणाने कर्नाटक हद्दीत हा मार्ग बंद तरी पडत होता किंवा कामानिमित्त बंद पाडावा लागत होता ; परंतु प्रथमतःच गोवा हद्दीत सदर रस्ता खचल्यामुळे बंद करावा लागला आहे. तर बेळगाव मार्गे गोव्यात जाणारी अवजड वाहने कुसमळी पूल अजूनही अवजड वाहनांना तयार न झाल्याने अवजड वाहने जांबोटी मार्गे पाठवण्यात येतात; परंतु तोही मार्ग अरुंद असल्याने अवजड वाहने समोरून येणाऱ्या वाहनांना चुकवण्याच्या नादात रस्त्याच्या बाजूच्या मातीत रुतत आहेत. त्यामुळे तासनतास या मार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. तर तमिळनाडू, आंध्रप्रदेश, बंगळूर आदी भागांतून आलेली अवजड वाहने हुबळी, यल्लापूर, कारवारमार्गे गोव्याला जात आहेत. तर काही चुकून आलेली वाहने रामनगर जोयडा कारवारमार्गे जात आहेत.