बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी लाल -पिवळा कन्नड ध्वज फडकवल्याच्या निषेधार्थ कोनेवाडी (ता. जि बेळगाव) येथे भगवा ध्वज फडकावून ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देऊन मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातील ५ जणांविरुद्ध न्यायालयाने वॉरंट जारी केला आहे. त्यांच्यापैकी शिवसेना नेते विजय शामराव देवणे हे आज सोमवारी बेळगाव चौथे जेएमएफसी न्यायालयात हजर झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

चार वर्षांपूर्वी बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड संघटनांकडून बेकायदेशीररित्या लाल -पिवळा ध्वज फडकवण्यात आला. सदर घटनेचा त्यावेळी मराठी भाषिकांकडून जोरदार निषेध करण्यात आला होता. ज्यामुळे वातावरण मोठ्या प्रमाणात तापले होते. अशा परिस्थितीत बेळगाव महापालिकेसमोर लाल -पिवळा ध्वज फडकवण्याच्या कृतीचा निषेध करण्यासाठी कोल्हापुर येथील शिवसेनेचे नेते विजय देवणे हे २१ जानेवारी २०२१ रोजी आपल्या सहकाऱ्यांसह बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी गावात दाखल झाले.

तेथे त्यांनी कन्नड ध्वजाच्या विरोधात भगवा ध्वज फडकावून जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या. तसेच आपल्या या कृतीचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यांची ही कृती म्हणजे कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

सदर खटल्याची सुनावणी बेळगाव चौथे जेएमएफसी न्यायालयात सुरू असून सुनावणीला सातत्याने गैरहजर राहत असल्याबद्दल न्यायालयाने विजय शामराव देवणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध वॉरंट जारी केले. त्यानुसार देवणे आज सोमवारी न्यायालयासमोर हजर झाल्यामुळे त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

वॉरंट जारी झालेल्या उर्वरित चौघाजणांमध्ये संग्रामसिंह भाग्यश्वरराव कुपेकर -देसाई, सुनील अर्जुन शिंत्रे, अमृत रामा जत्ती व संतोष लक्ष्मण मळवीकर यांचा समावेश आहे. सदर खटल्याची पुढील तारीख १८ जुलै ही असून आरोपींच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार आणि ॲड. हेमराज बेंचन्नावर काम पाहत आहेत. शिवसेना नेते विजय देवणे आज न्यायालय आवारात दाखल झाले त्यावेळी शिवसेना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, नगरसेवक रवी साळुंके, महेश टंकसाळी, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर आदीसह स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.