• पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

आंबोली / वार्ताहर

मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर निसर्गरम्य कोकणात पर्यटनासाठी गर्दी वाढली आहे. मात्र, हवामानाचा अंदाज न आल्याने आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याने अपघातांच्या घटनाही समोर येत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना आंबोली घाटातील प्रसिद्ध कावळेसाद पॉईंटवर घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चिले कॉलनीचे रहिवासी आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र बाळासो सनगर (वय 45) हे आपल्या 14 सहकाऱ्यांसह वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे आले होते. निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत असताना रेलिंगजवळ पडलेला रुमाल उचलण्यासाठी ते रेलिंगच्या पलीकडे गेले. त्यावेळी पाय घसरून ते खोल दरीत कोसळले.

या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आंबोली रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. मात्र, घटनास्थळी दाट धुके आणि मोबाईल नेटवर्कचा अभाव असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. तसेच, वाऱ्याचा जोर आणि धबधब्याच्या उलट्या प्रवाहामुळे बचावकार्य आणखीनच कठीण झाले आहे. राजेंद्र सनगर यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, रुमाल उचलण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे समजते.

सध्या स्थानिक प्रशासन,पोलीस आणि बचाव पथक मिळून शोध आणि बचावकार्यात गुंतले असून अंधार आणि खराब हवामानामुळे यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. या घटनेनंतर पर्यटकांनी निसर्गाच्या सान्निध्यात असताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत, रेलिंगच्या पलीकडे जाणे टाळावे आणि हवामानाची माहिती घेऊनच पर्यटन स्थळी जावे, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे.