विजयपूर / दिपक शिंत्रे
महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आलमट्टी जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून, खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत गुरुवारी ७० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीमध्ये करण्यात आला आहे.
सकाळी ५०,०೦० क्युसेक इतका असलेला विसर्ग संध्याकाळी ७ वाजता ७० हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात पावसाचा जोर कायम असून, कोयना, नवजा, महाबळेश्वर, राधानगरी, दूधगंगा, वारणा आणि इतर भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कमी झालेला नाही. त्यामुळे कळळोळ बॅरेजकडे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून विसर्ग वाढवण्यात आला आहे. ५१९.६० मीटर इतक्या कमाल उंचीच्या जलाशयात सध्या ५१५.४८ मीटर इतक्या उंचीपर्यंत पाणी साठवले गेले असून, एकूण ६७.६६५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. जलाशयात ५४ टक्क्यांपर्यंत भरले आहे. संध्याकाळपर्यंत जलाशयात ७८,२५० क्युसेक इतका पाण्याचा आवक झाला आहे. पाण्याचा आवक अधिक झाल्यास, विसर्ग अजून वाढवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जून महिन्यातच मोठ्या प्रमाणात पाण्याचा आवक झाल्याने, जरी जलाशय ५४ टक्के भरलेले असले तरीही, संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी विसर्ग वाढवण्यात आला आहे. जुलैपासून जलाशय पूर्ण भरण्यासाठी पावले उचलली जातील. सध्या पूराचा धोका लक्षात घेऊन विसर्ग वाढवण्यात आला आहे, असे केबीजेएनएलचे अधिकाऱ्यांनी सांगितले जलाशयाच्या उजव्या बाजूच्या आलमट्टी वीज निर्मिती केंद्रातून ४२,५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले असून, यामुळे केंद्रातील सर्व ६ युनिट्स कार्यरत असून, सध्या २२५ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे, अशी माहिती केपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली
“सध्या पूराचा कोणताही धोका नाही. नदीकाठच्या गावांमध्ये लोक व जनावरांनी नदीच्या दिशेने जाऊ नये, नदीत उतरणे टाळावे यासाठी इशारा देण्यात आला आहे.”असे तहसीलदार ए.डी. अमरवाडगी यांनी कळविले आहे.