- अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला
खेड : मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट १०० फूट खाली कोसळली. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला तर कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर खेडजवळ सोमवारी (१९ मे) पहाटे हा भयानक अपघात झाला. पोलिसांच्या सांगण्यानुसार, अपघातातील मृत हे मिरा रोडचे रहिवासी असून ते अंत्यविधींसाठी देवरूखच्या दिशेने जात होते. मात्र कारचा वेग जास्त असल्यानेच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही कार थेट जगबुडी नदीच्या पात्रात १०० ते १५० फूटखाली कोसळली. अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि बचावकार्य तातडीने सुरू केले. ही कार क्रेनच्या साहाय्याने वर उचलण्यात आली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारमधील पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी खेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.








