• गृहमंत्री अमित शाह तातडीने श्रीनगरला रवाना

जम्मू काश्मीर (पहलगाम) : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

या घटनेबाबत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, येथे शस्त्रधारी दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटावर भ्याड हल्ला केला. त्यामध्ये, अनेक पर्यटकांचा जीव गेला असून काही गंभीर जखमी देखील झाले आहेत. या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह तातडीने श्रीनगरकडे रवाना झाले आहेत.

पहलगाममध्ये पोलिसांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपले लक्ष्य केले. पर्यटकांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या वेळी एक नवविवाहित जोडपेदखील दहशतवाद्यांच्या हल्लातून सुटले नाही. या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले.

या दहशतवादी हल्ल्यातील एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नाव समोर आली आहेत.

 

  • पर्यटकांसाठी चोवीस तास पोलीस मदत कक्ष :

पोलिसांकडून काश्मीरमधील पर्यटकांसाठी चोवीस तास मदत सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनंतनाग येथील पोलीस कंट्रोल रुममधून ही सेवा पुरविण्यात आली असून व्हॉट्सअप आणि टेलिफोन नंबरही जारी करण्यात आले आहेत. पर्यटकांनी खालील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • मोबाईल क्रमांक : 9596777669 , 01932225870 ; व्हॉट्सॲप क्रमांक : 9419051940