- चेन्नई सुपर किंग्जच्या मेंटॉरपदाची नवी जबाबदारी
क्रीडा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी याने आयपीएलमधील खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली आहे. २०२७ च्या आयपीएल हंगामापासून तो चेन्नई सुपर किंग्जच्या मेंटॉरची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे चेन्नई संघासोबतचा त्याचा प्रवास सुरू राहणार असला, तरी त्याची जबाबदारी बदलणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांनी धोनीचे संघातील योगदान अधोरेखित केले आहे. धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्जची कल्पना करणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले. २००८ पासून धोनीने जवळपास दोन दशके चेन्नईसोबत काम केले असून, त्याच्या नेतृत्वाखाली संघाने मोठे यश मिळवले आहे. चेन्नईसाठी धोनीची निवड करणे हा आपला सर्वोत्तम निर्णय होता, असेही श्रीनिवासन यांनी नमूद केले.
२००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. चेन्नई संघावर बंदी असलेल्या कालावधीत त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडूनही प्रतिनिधित्व केले. दरम्यान, चेन्नईने ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली असून, संजू सॅमसनचाही संघात समावेश केला आहे.
- धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईला पाच विजेतेपदे
धोनीने आयपीएलमध्ये एकूण २७८ सामने खेळताना ५,४३९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २४ अर्धशतके असून, २६४ षटकार आणि ३७५ चौकारांची नोंद आहे. याशिवाय यष्टिरक्षक म्हणून त्याने १५८ झेल आणि ४७ यष्टिचित केले आहेत. त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ८४ आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. त्याच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ तब्बल दहा वेळा अंतिम फेरीत पोहोचला. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर आता मेंटॉरच्या भूमिकेतून धोनी चेन्नईच्या संघासाठी मार्गदर्शन करणार आहे.







