• जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
  • तीन दिवसीय उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिकाऱ्यांना सूचना

बेळगाव : वीरराणी कित्तूर चन्नम्मा उत्सव-२०२६ यशस्वी करण्यासाठी सर्व उपसमित्यांनी परस्पर समन्वय राखून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.

मंगळवारी (१३ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कित्तूर उत्सवाच्या उपसमित्यांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

उत्सवाच्या आयोजनासाठी यापूर्वीच विविध उपसमित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विजया ज्योती, स्वागत, निवास, भोजन, मंच, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणूक अशा समित्यांनी आपापल्या कामाचे नियोजन करून जबाबदारीने कार्य करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, प्रत्येक उपसमितीला मंजूर करण्यात आलेल्या निधीचा योग्य वापर करून कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कित्तूर येथे होणाऱ्या तीन दिवसीय उत्सवाचे व्यवस्थापन करताना काकती येथील उत्सवाशीही योग्य समन्वय राखावा. उत्सव भव्य आणि यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करून आवश्यक व्यवस्था वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

या बैठकीला प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग, उपविभागीय अधिकारी प्रवीण जैन, श्रवण कुमार नायक, सौंदत्ती यल्लम्मा विकास प्राधिकरणाच्या सचिव राजश्री जैनापुर, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.