- रस्ते दुरुस्ती, विद्युत रोषणाई, स्वच्छता आणि सीमोल्लंघन कार्यक्रमाच्या जागेची तयारी वेळेत पूर्ण करण्याची मागणी
बेळगाव : शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला दसरा महोत्सव यंदाही शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मध्यवर्ती दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. महापालिका आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर यांनी हे निवेदन स्वीकारले.
गेल्या अनेक वर्षांपासून मध्यवर्ती दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही उत्सवाची तयारी वेळेत पूर्ण करण्यासाठी महामंडळ आणि महापालिका प्रशासनाने समन्वयाने काम सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, विद्युत रोषणाई, स्वच्छता तसेच मुख्य सीमोल्लंघन कार्यक्रमाच्या ठिकाणी आवश्यक पूर्वतयारी प्रशासनाने वेळेत पूर्ण करावी, अशी विनंती महामंडळाने केली आहे. उत्सवाच्या काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि कार्यक्रम सुरळीत पार पडावेत, यासाठी संबंधित कामांना वेळेत सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मध्यवर्ती दसरा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, उपाध्यक्ष संदीप कामुले, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, श्री देव दादा सासणकठीचे लक्ष्मण किल्लेकर, श्रीनाथ पवार, पंकज किल्लेकर, गिरीश पाटील, सौरभ पवार, मारुती गल्ली मारुती देवस्थानचे प्रमोद बिर्जे, मातंगी देवस्थान (कसाई गल्ली)चे बुद्रुद्दीन, वीरभद्र देवस्थान (अशोक नगर)चे मुर्गेंद्र अंगडी, किरण खुद्दार, हर्षल नाईक, जोतिबा धामणेकर, प्रसाद मरगाळे यांच्यासह विविध देवस्थानांचे प्रतिनिधी आणि महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.








