बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ, बेळगावच्या वतीने यंदाचा श्री गणेशोत्सव शांतता, शिस्त व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या बेळगाव पोलीस प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

महामंडळाचे अध्यक्ष श्री. रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. प्रकाश निकम तसेच DCP श्री. नारायण बरमनी यांची भेट घेऊन गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाने केलेल्या उल्लेखनीय सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध गणेश मंडळे, मिरवणुका, भाविकांची मोठी गर्दी, वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बेळगाव पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. उत्सव शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले.

विशेषतः अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी जवळपास ४२ तास अहोरात्र पोलीस प्रशासन कार्यरत होते. शहरातील प्रमुख चौक, विसर्जन मार्ग, संवेदनशील ठिकाणे तसेच गर्दीच्या परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. वाहतूक नियंत्रण, नागरिकांची सुरक्षितता आणि गणेश मंडळांच्या मिरवणुका शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलिसांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

गणेशोत्सव हा बेळगावच्या सामाजिक व सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असून, उत्सव शांततेत पार पडण्यासाठी गणेश मंडळे, नागरिक, प्रशासन आणि पोलीस यांच्यातील समन्वय महत्त्वाचा आहे. यंदाच्या उत्सवात पोलीस प्रशासनाने दाखविलेली तत्परता, संयम आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे गणेशोत्सवाची सांगता शांततामय वातावरणात झाली, असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी श्री. रमाकांत दादा कोंडुसकर यांनी बेळगाव पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वाहतूक पोलीस, बंदोबस्त पथके आणि संबंधित प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलिसांनी केलेले कार्य समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

या भेटीप्रसंगी महामंडळाचे श्री. रणजीत पाटील, जनसंपर्क प्रमुख श्री. विकास कलघटगी, कार्यकारी सचिव प्राचार्य श्री. आनंद आपटेकर, श्री. शिवराज पाटील, श्री. संजय शिंदे, श्री. कपिल भोसले, श्री. प्रशांत भातखंडे, श्री. जयराज हलगेकर, श्री. प्रसाद मरगळे, श्री. महेश जाधव, श्री. प्रदीप अलकुंटे आणि श्री. रवी साळुंखे उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे आणि नागरिकांच्या संयमी सहभागामुळे बेळगावचा गणेशोत्सव शांतता, शिस्त आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला, असा विश्वास यावेळी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.