- आठवड्यातील तीन दिवसांची सेवा आता सातही दिवस
- बेंगळुरू – बेळगाव सकाळची सेवाही दररोज
बेळगाव : बेळगाव-दिल्ली मार्गावरील ‘इंडिगो’ची विमानसेवा येत्या १ ऑक्टोबरपासून आठवड्याचे सातही दिवस सुरू होणार आहे. यापूर्वी ही सेवा आठवड्यातील केवळ तीन दिवसांपुरती मर्यादित करण्यात आली होती. त्यामुळे उद्योजक, व्यापारी, डॉक्टर तसेच दिल्लीला प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू यांची भेट घेऊन सेवा दररोज सुरू करण्याची मागणी केली होती.
खासदार शेट्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोने यापूर्वी दिल्ली-बेळगाव मार्गावर दररोज विमानसेवा सुरू ठेवली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही सेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशा आठवड्यातील तीन दिवसांपुरती मर्यादित करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती.
याबाबत केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी करण्यासोबतच इंडिगोच्या अधिकाऱ्यांनाही पत्र देण्यात आले होते. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून दिल्लीहून दररोज सकाळी ६.१५ वाजता विमान सुटून सकाळी ८.४० वाजता बेळगावात पोहोचेल, तर बेळगावहून सकाळी ९.१० वाजता विमान सुटून सकाळी ११.४० वाजता दिल्लीला पोहोचणार आहे.
दरम्यान, बेंगळुरू – बेळगाव मार्गावरील सकाळची विमानसेवाही १ ऑक्टोबरपासून आठवड्याचे सातही दिवस सुरू होणार आहे. सध्या ही सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार, अशी चार दिवस सुरू आहे. तसेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवारची संध्याकाळची सेवा कायम राहणार आहे. आगामी काळात ही संध्याकाळची सेवाही दररोज सुरू करण्याबाबत इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचे खासदार शेट्टर यांनी सांगितले.








