• ३ ते २१ ऑक्टोबरदरम्यान सुटी ; २२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू

बेंगळुरू : राज्यातील लाखो शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दसरा सुटीची घोषणा शिक्षण विभागाने केली असून यंदा विद्यार्थ्यांना सलग १९ दिवसांची सुटी मिळणार आहे.

राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना ही सुटी लागू असणार आहे. शिक्षण विभागाच्या वार्षिक शैक्षणिक वेळापत्रकानुसार, दसरा सुटीला ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरुवात होणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी (बुधवारी) विजयादशमीच्या दिवशी सुटीचा शेवट होईल. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होतील.

दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने विद्यार्थ्यांना सलग सुट्यांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे दसरा सण साजरा करण्यासह सहलीचे नियोजन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

शैक्षणिक वेळापत्रकानुसार, दुसरे सत्र २२ ऑक्टोबर २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत असेल. त्यानंतर ११ एप्रिल २०२७ पासून उन्हाळी सुटी सुरू होणार आहे. दरम्यान स्थानिक हवामान परिस्थिती किंवा अन्य आवश्यकतेनुसार सुटीच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्याचा अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या उपसंचालकांना देण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या या घोषणेमुळे दसरा सण आणि पर्यटनाचे नियोजन करणाऱ्या विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.