• प्रार्थना आटोपून घरी परतणाऱ्या वृद्धेची दोघा भामट्यांकडून फसवणूक

बेळगाव : पोलिस असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी ७५ वर्षीय वृद्ध महिलेची दिशाभूल करून तिच्याकडील तब्बल २ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता. १०) सकाळी बसव कॉलनी परिसरात घडली.

तंगम्मा पी. एल. (वय ७५, रा. बसव कॉलनी, बॉक्साइट रोड) या गुरुवारी सकाळी ६.४५च्या सुमारास सेंट जोसेफ चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेल्या होत्या. प्रार्थना आटोपून त्या पायी घरी परतत असताना सकाळी साडेसातच्या सुमारास बसव कॉलनीतील मेजबान मॅरेज हॉलसमोर दोन भामट्यांनी त्यांना अडविले.

यातील एका व्यक्तीने चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर हेल्मेट घातले होते. आपण क्राईम ब्रँचचा पोलिस कर्मचारी असल्याचे सांगत पुढे खून झाला असून तपासणी सुरू असल्याचे त्याने तंगम्मा यांना भासवले.

दरम्यान, त्याच्यासोबत असलेल्या दाढीच्या व्यक्तीनेही आपल्या गळ्यातील सोन्याची चेन काढून त्या व्यक्तीकडे दिली. त्यामुळे तंगम्मा यांचा भामट्यांवर विश्वास बसला.

यानंतर भामट्यांनी तंगम्मा यांच्याकडील सोन्याची चेन आणि तीन सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या. दागिने कागदात बांधून सुरक्षित करून देतो, असे सांगून त्यांनी दागिने ताब्यात घेतले आणि दुचाकीवरून हिंडलगा ब्रिजच्या दिशेने पसार झाले.

तंगम्मा यांच्याकडील ४० ग्रॅम वजनाच्या सोनसाखळीची किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये, तर ३० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या बांगड्यांची किंमत सुमारे ९० हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला. याप्रकरणी बेळगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.