• जन्म – मृत्यू दाखले आता घरपोच

बेळगाव : बेळगाव महापालिकेकडून मिळणारे जन्म व मृत्यू दाखले आता नागरिकांना घरपोच मिळणार आहेत. यासाठी बेळगाव महापालिका आणि टपाल विभागाच्या बेळगाव विभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे दाखल्यांसाठी महापालिका कार्यालयात वारंवार जाण्याची नागरिकांची गरज कमी होणार असून, वेळ आणि प्रवासाचा खर्चही वाचणार आहे.

यासंदर्भात शुक्रवारी (ता. ११) महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्या कक्षात बैठक झाली. यावेळी आयुक्त कार्तिक एम. आणि टपाल विभागाच्या बेळगाव विभागाच्या वरिष्ठ अधीक्षक आरूषी शर्मा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेकडे अर्ज करताना दाखला टपालाद्वारे हवा असल्याचे स्पष्ट करावे लागणार आहे. त्यासाठी अर्जासोबत संपूर्ण पत्ता आणि आवश्यक संमती देणेही बंधनकारक आहे. त्यानंतर महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखले वितरण विभागाकडून संबंधित दाखला टपाल विभागामार्फत अर्जदाराच्या पत्त्यावर पाठविला जाणार आहे.

महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले की, नागरिकांना शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता कमी व्हावी आणि सेवा अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

जन्म-मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करताना टपालाद्वारे प्रमाणपत्र घेण्याची इच्छा आणि पत्ता दिल्यास दाखला घरपोच पाठविण्यात येईल. नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जन्म-मृत्यू नोंदणी अधिकारी अशोककुमार सज्जन, टपाल विभागाचे अधिकारी मारुती दोडमनी आणि अनंतशयन उपस्थित होते. दाखला घरपोच मिळविताना टपाल विभागाचे शुल्क नागरिकांना भरावे लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.