• १४ हजारांहून अधिक सह्यांचे कॅन्टोन्मेंट सीईओंना निवेदन

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरातील तीन प्रमुख रस्ते लष्कराकडे हस्तांतरित करण्यास तसेच दोन रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारण्याच्या प्रस्तावाला बेळगाव कॅन्टोन्मेंट रेसिडेन्शियल वेल्फेअर असोसिएशनने (बीसीआरडब्ल्यूए) तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात सोमवारी कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १४,१३६ सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

१७ जुलै रोजी झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीतील ठराव क्रमांक २६ आणि २७ नुसार अल्बर्ट एक्का रोड, स्मार्ट रोड आणि क्वीन्स गार्डन रोड हे तीन रस्ते लष्कराकडे सोपविण्याबाबत नागरिकांकडून मते मागविण्यात आली आहेत. त्याचबरोबर इंडिपेंडन्स रोड आणि जिमखाना रोडवर उंच बॅरिकेड्स उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

या प्रस्तावांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने बीसीआरडब्ल्यूएने जनजागृती मोहीम राबवून नागरिकांच्या सह्या घेतल्या. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असून, नागरिकांची नावे, पत्ते, दूरध्वनी क्रमांक आणि सह्यांसह निवेदन कॅन्टोन्मेंट सीईओंकडे सादर करण्यात आले.

शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, व्यावसायिक, गृहिणी, वकील, डॉक्टर यांच्यासह समाजातील विविध घटकांनी या मोहिमेला पाठिंबा दिल्याचे संघटनेने सांगितले.

कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्ते बंद केल्यास शहरातील दळणवळणावर परिणाम होऊन स्थानिक नागरिकांच्या रोजगारासह बेळगावच्या आर्थिक विकासालाही फटका बसू शकतो, असा आक्षेप बीसीआरडब्ल्यूएने नोंदविला आहे. तसेच बेळगावचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्याच्या उद्दिष्टाशीही अशा प्रकारची रस्तेबंदी विसंगत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

अनेक दशकांपासून नागरिकांच्या वापरात असलेले कॅन्टोन्मेंटमधील रस्ते कोणत्याही प्रकारे बंद किंवा अडवू नयेत, अशी मागणी संघटनेने केली. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, संरक्षण मंत्रालय तसेच लष्कर मुख्यालयाने दिलेल्या आदेशांचे योग्य प्रकारे पालन करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

जनतेच्या मागणीचा विचार करून लष्कर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने रस्ते बंद करण्याचा तसेच बॅरिकेड्स उभारण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा, असे आवाहन बीसीआरडब्ल्यूएने केले आहे.

यावेळी माजी आमदार अनिल बेनके, बेळगाव कॅन्टोन्मेंट रेसिडेन्शियल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष फारुक नवाब, सचिव रंजन शेट्टी, डॉ. नितीन खोत, अजय पै, साजिद शेख, कॅन्टोन्मेंट सदस्य सुधीर तुपेकर, डॉ. सोनाली खोत, डॉ. राहिला शेख, नयना नेरली, ॲड. सुलतानपुरे तसेच बार असोसिएशनचे प्रतिनिधी आणि कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.