बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प येथे स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य श्री. मनोहर करडी, सर्व शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते.
नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. मनोज सरांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध मार्चपास्ट सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी व कन्नड भाषेत प्रभावी भाषणे, देशभक्तिपर समूहगीत, हिंदी काव्यवाचन व समूह नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या मास्टर रिधान पाटील व मास्टर शौर्य खन्नुकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “स्वातंत्र्यदिन केवळ देशभक्तीचा पोशाख परिधान करण्यापुरता मर्यादित नसून, स्वातंत्र्यवीरांची ओळख, त्यांचा त्याग आणि राष्ट्रासाठीचे योगदान जाणून घेण्याचा दिवस आहे,” असा प्रेरणादायी संदेश दिला. देशप्रेम, शिस्त, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देत हा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.








