येळ्ळूर : येथील कर्नाटक पब्लिक स्कूल मराठी मॉडेल शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा दिव्या कुंडेकर होत्या. यावेळी एसडीएमसीचे उपाध्यक्ष, सदस्य, सदस्या, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन एसडीएमसी सदस्या अल्का कुंडेकर व रेश्मा काकतकर यांच्या हस्ते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन एसडीएमसी सदस्य जोतिबा पाटील व दिनेश लोहार यांच्या हस्ते करण्यात आले. शशिकांत पाटील यांनी श्रीफळ वाढविले. त्यानंतर शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी यांनी ध्वजस्तंभाचे पूजन केले. एसडीएमसी अध्यक्षा दिव्या कुंडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला वंदेमातरमच्या घोषात मानवंदना देण्यात आली.

यानंतर विद्यार्थ्यांनी गावातील विविध गल्ल्यांमधून प्रभातफेरी काढली. सांबरेकर गल्लीतील अमर शिवसेना युवक मंडळ आणि तानाजी गल्लीतील तानाजी युवक मंडळाने प्रभातफेरीचे स्वागत करून ध्वजारोहण केले व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप केले. कलमेश्वर गल्लीतील युवक, सेवानिवृत्त सैनिक रावजी पाटील, स्वामी विवेकानंद सोसायटी, नेताजी सोसायटी आणि एसडीएमसी सदस्या ज्योती पाटील यांनीही विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्या. येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने पीडीओ व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे वाटप केले.

शाळेत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीते आणि विविध सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली. भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त केंद्रीय अधिकारी सूर्यकांत महादेव मुरकुटे यांनी प्रत्येकी १०० रुपयांचे बक्षीस दिले. देशभक्तीपर गीत सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना एसडीएमसी सदस्य मारुती यळगुकर यांनी आपल्या आजी कै. गंगुबाई यळगुकर यांच्या स्मरणार्थ पेन भेट दिले.

एसडीएमसी उपाध्यक्ष जोतिबा उडकेकर यांनी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत शाळेच्या प्रभातफेरीत सहभागी झालेल्या विविध युवक मंडळे, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आभार मानले. अध्यक्षा दिव्या कुंडेकर यांनीही विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रभातफेरी काढून देशभक्तीपर भाषणे व गीते सादर केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे स्वागत ऐश्वर्या मेणसे यांनी केले. सूत्रसंचालन मेघा देसाई यांनी केले, तर आभार सातेरी पाखरे यांनी मानले. यावेळी एसडीएमसी सदस्य मारुती यळगुकर, चांगदेव मुरकुटे, शशिकांत पाटील, जोतिबा पाटील, दिनेश लोहार, मुर्तिकुमार माने, सदस्या शुभांगी मुतगेकर, मयुरी कुगजी, ज्योती पाटील, अर्चना देसाई, अल्का कुंडेकर, रेश्मा काकतकर, वरिष्ठ मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.