बेळगाव : बेळगावातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, आयजीपी कार्यालय आणि जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सोहळ्यात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताच्या सूरांमध्ये राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उत्तर विभागाच्या आयजीपी कार्यालयात आयजीपी संदीप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रगीतासह ध्वजास मानवंदना दिल्यानंतर त्यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) कार्यालयात एसपी के. रामराजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यास पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.