- KAT समोर २७ जुलै रोजी गुणवत्तेवर सुनावणी
बेळगाव : जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनच्या कायदेशीर लढ्याला आज महत्त्वपूर्ण यश मिळाले. धारवाड येथील माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रकरणातील विलंब (Delay) माफ (Condone) करत पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा केला.
आज सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता सुरू झालेल्या सुनावणीत जवळपास दीड तास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. जय किसान असोसिएशनतर्फे चारही वकील न्यायालयासमोर उपस्थित राहून गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विलंबाच्या मुद्द्यावर सविस्तर बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने विलंब माफ करत प्रकरण पुढे चालविण्यास परवानगी दिली. तसेच, एपीएमसी, बेळगाव आणि श्री. सिद्धगौडा मोदगी यांनी दाखल केलेल्या दोन रिट याचिका फेटाळून लावल्या.
याशिवाय, प्रकरणाचा अंतिम निर्णय गुणवत्तेच्या (Merits) आधारावर व्हावा, यासाठी हे प्रकरण कर्नाटक अपिलेट ट्रिब्युनल (KAT) कडे वर्ग करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. KAT समोर या प्रकरणाची पहिली सुनावणी २७ जुलै २०२६ रोजी होणार आहे.
फेटाळण्यात आलेल्या याचिकांच्या संदर्भात माननीय न्यायालयाने विरोधी पक्षांवर ₹२५,००० खर्च (Costs) देखील आकारला आहे. या निर्णयामुळे जय किसान होलसेल व्हेजिटेबल मार्केटशी संबंधित कायदेशीर प्रक्रियेला नवी दिशा मिळाल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. या लढ्यात सातत्याने साथ देणाऱ्या कायदेशीर टीम, सर्व सदस्य, शेतकरी, व्यापारी, समर्थक आणि हितचिंतकांचे असोसिएशनने मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, एकजूट, जिद्द आणि विश्वास यांच्या बळावर आपण आजपर्यंतचा टप्पा गाठला आहे. न्याय मिळेपर्यंत आपण सर्वांनी अशाच एकजुटीने उभे राहावे.








