- संशयित रूममेट फरार ; शोध सुरू
खानापूर : कामानिमित्त नेपाळमध्ये गेलेल्या खानापूर येथील एका तरुणाची त्याच्याच रूममेटने चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नेपाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बेळगाव पोलिसांच्या समन्वयाने आरोपीचा शोध सुरू आहे.
मृत तरुणाचे नाव साहिल रियाजअहमद मोमिन (वय २५, रा. निंगापूर गल्ली, खानापूर) असे आहे. अवघ्या २५ दिवसांपूर्वी तो नेपाळमधील झापा जिल्ह्यातील दमक येथील एका हॉटेलमध्ये नोकरीस लागला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आणि त्याचा उत्तर प्रदेशातील रूममेट सद्दाम हुसेन यांच्यात घटनेच्या आदल्या रात्री वाद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी पहाटे साहिल झोपेत असताना आरोपीने त्याच्या पोटात चाकूने वार करून घटनास्थळावरून पलायन केले.
गंभीर जखमी झालेल्या साहिलला तातडीने रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून तो उत्तर प्रदेशात पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच मृताच्या कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने नेपाळकडे धाव घेतली आहे. साहिलचा मृतदेह सोमवारपर्यंत खानापूर येथे आणला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या हत्येप्रकरणी नेपाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बेळगाव पोलिसांनीही संबंधित राज्यातील पोलिसांशी संपर्क साधत आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. शांत व मनमिळावू स्वभावामुळे परिचित असलेल्या साहिलच्या अकाली निधनाने खानापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







