- पाही वाईब्स व शक्ती सामर्थ्य फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
- मौखिक आरोग्याबाबत जनजागृती
बेळगाव : पाही वाईब्स फाउंडेशन आणि शक्ती सामर्थ्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिवनगर येथील शासकीय मराठी शाळा क्रमांक ४१ आणि शासकीय कन्नड शाळा क्रमांक २२ मधील विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी व मौखिक आरोग्य जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये दंतस्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि योग्य सवयी रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
शिबिरात विद्यार्थ्यांना दात घासण्याची योग्य पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आली. ‘मिलियन डॉलर स्माईल’च्या डॉ. स्नेहा बडवन्नावर (बीडीएस, एमडीएस – ओरल पॅथॉलॉजी) यांनी डॉ. सिमरन सूर्यवंशी यांच्या सहकार्याने संवादात्मक सत्राचे मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिके, प्रश्नोत्तरे आणि विद्यार्थ्यांशी थेट संवादाच्या माध्यमातून मौखिक आरोग्याचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाला शक्ती सामर्थ्य फाउंडेशनच्या संस्थापक-संचालिका लता अनसकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी पाही वाईब्स फाउंडेशनच्या संस्थापक-संचालिका रक्षा यू यांनी, “वंचित आणि गरजू मुलांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तोंडाच्या स्वच्छतेसाठी आज उचललेले छोटे पाऊल उद्या निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण हास्य घडवेल,” असे सांगितले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. स्नेहा बडवन्नावर, डॉ. सिमरन सूर्यवंशी, संबंधित शाळांचे शिक्षक व कर्मचारी तसेच सर्व स्वयंसेवकांचे पाही वाईब्स फाउंडेशनने आभार मानले.








