• सिंचन, वीज व आरोग्य सुविधांसाठी कोट्यवधींच्या निधीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

बेळगाव : खानापूर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची बेळगाव येथे भेट घेऊन विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची मागणी केली. तालुक्यातील सिंचन, वीज आणि आरोग्य सुविधांबाबतचे प्रस्ताव सादर करत आवश्यक मंजुरी देण्याची विनंती त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात तालुक्यातील सिंचन प्रकल्पांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी, परिषद-अवरोळी प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये तसेच जळगा, शेडेगाळी, निलावडे आणि तोराळी गावांतील नदी प्रकल्पांसाठीही कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

जंगलव्याप्त आणि अतिवृष्टीग्रस्त खानापूर तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्या (यूजी केबल) टाकण्यात याव्यात, बैलूर-कणकुंबी येथे नवीन वीज उपकेंद्रांची उभारणी करावी, अशी मागणीही आमदार हलगेकर यांनी केली.

तालुक्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जांबोटी आणि कुंभार्डा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

आमदार हलगेकर यांनी मांडलेल्या विविध विकासकामांच्या मागण्यांची मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सकारात्मक दखल घेतली असून, खानापूर तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.