बेळगाव : शहरातील फर्स्ट गेट परिसरातील रेल्वे रुळाजवळ झालेल्या अपघातात एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. रेल्वे रुळाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि टिळकवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला.
सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून त्याची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मृत व्यक्ती नेमकी कोणत्या ठिकाणची आहे, याबाबतही अद्याप स्पष्टता आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, हा प्रकार आत्महत्येचा आहे की अपघाती मृत्यू झाला आहे, याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून सर्व शक्यतांचा विचार करत पुढील तपास सुरू केला आहे.








