• ३.७३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; आरोपी अटकेत

खानापूर : कणकुंबी सीमाभागात उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारी कार पकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कणकुंबी चेकपोस्टवर वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली. यावेळी संशयावरून थांबविण्यात आलेल्या मारुती सुझुकी रिट्झ कारची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली.कारमधून सुमारे ५१.८४ लिटर व्हिस्की व रम तसेच ३६ लिटर बिअर जप्त करण्यात आली. ही दारू केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी अधिकृत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी बेळगाव तालुक्यातील हलगा गावचा रहिवासी प्रसाद शंकर पुनाजी याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी वाहनासह दारू असा एकूण ३ लाख ७३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कर्नाटक अबकारी कायद्यांतर्गत उत्पादन गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित वाहन मालकाचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.