- प्रवाशाचा विसरलेला सोन्याचा हार व रोख रक्कम केली परत
- सहदेव मोरे यांची आदर्श कृती ; माणुसकीचे जिवंत उदाहरण
- सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
खानापूर : शहरातील एका रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे माणुसकीचा प्रत्यय आला आहे. प्रवाशाने रिक्षात विसरलेला सोन्याचा हार आणि रोख रक्कम प्रामाणिकपणे परत करून सहदेव मोरे यांनी समाजासमोर आदर्श उभा केला आहे.
शहरातील शिवस्मारक चौक ऑटो स्टँड येथे कार्यरत असलेले सहदेव मोरे यांच्या रिक्षात एका महिला प्रवाशाची पर्स राहून गेली होती. या पर्समध्ये दीड तोळ्यांचा सोन्याचा हार आणि रोख रक्कम होती. सकाळी रिक्षात पर्स आढळल्यानंतर मोरे यांनी ती सुरक्षित ठेवत शिवस्मारक ऑटो संघाचे अध्यक्ष दत्ता वंजारे यांच्याशी संपर्क साधला.
दरम्यान, मूळ करंबळ गावच्या आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या राजश्री मनोळकर व त्यांचे पती सुभाष मनोळकर हे नातेवाईकांच्या लग्नासाठी खानापूरला आले होते. संध्याकाळी सहदेव मोरे यांच्या रिक्षाने करंबळकडे जात असताना गडबडीत राजश्री यांनी आपली पर्स रिक्षातच विसरली होती.
दत्ता वंजारे यांनी तात्काळ प्रवाशांचा शोध घेऊन पर्स सुरक्षित असल्याची माहिती दिली. त्यानंतर दुपारी ऑटो स्टँडवर राजश्री आणि सुभाष मनोळकर यांना त्यांच्या पर्समधील दीड तोळ्यांची सोन्याचा हार आणि रोख रक्कम परत करण्यात आली. या वेळी मारुती जोशीलकर, शंकर चौगुले, विशाल पाटील, प्रदीप बोबाटे, पत्रकार वासुदेव चौगुले, गजानन बेळगावकर आदी उपस्थित होते.
सहदेव मोरे यांच्या या प्रामाणिक कृतीमुळे खानापूरमध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.








