• शिवज्योतींचे भव्य स्वागत

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ बेळगावतर्फे शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भक्तीभाव आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीचे विधिवत पूजन करून अभिषेक आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला.

शिवजयंतीनिमित्त विविध गड-किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींचे सकाळी धर्मवीर संभाजी चौक येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर या शिवज्योतींसह शिवभक्तांची मिरवणूक छत्रपती शिवाजी उद्यानात पोहोचली. उद्यानात आयोजित मुख्य कार्यक्रमात महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, भाजप नेते शंकरगौडा पाटील, किरण जाधव, ॲड. मुरुगेंद्रगौडा पाटील यांच्यासह मान्यवरांनी शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी”, “हर हर महादेव” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे रंगकाम मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पूर्ण करण्यात आले असून त्याचा सर्व खर्च रमाकांत कोंडुसकर यांनी उचलला आहे. बेळगावातील शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झाला असून 21 एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य चित्ररथ मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे. 60 ते 70 चित्ररथांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सादर केला जाणार असून ही मिरवणूक शिस्तबद्ध व शांततेत पार पडावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

या कार्यक्रमास माजी नगरसेवक नेताजी जाधव, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, पोलीस उपायुक्त नारायण बरमनी, रमेश पावले, विकास कलघटगी यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.