- अनेक गावांतून सह्या केलेली पुस्तके सुपूर्द करण्यास सुरुवात
बेळगांव : सीमा लढ्यातील पहिले हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या कंग्राळी खुर्द गावातून तीन हजारहून अधिक सह्यांचे पुस्तक शनिवारी बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच आंबेवाडी गावातील सह्या घेतलेले पुस्तकही अर्जुन बांबू कातकर, लक्ष्मण शट्टू कातकर, देवाप्पा शहापूरकर, शिवाजी गोविंद लोहार, बाळू तानाजी कातकर यांनी यावेळी दिले. ही पुस्तके पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याची सुनावणी त्वरित घेऊन सलगपणे करावी व निकाल द्यावा अशी विनंती पत्रकार संघातर्फे सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. याबाबतचे सीमा भागातून एक लाख सह्यांचे निवेदन त्यांना देण्यात येणार आहे. या मोहिमेला सीमा भागातून तसेच महाराष्ट्रातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सर्व भागातील कार्यकर्ते सह्या घेण्याचे काम जोमाने करत आहेत याबद्दल पत्रकार संघातर्फे यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, ॲड. एम. जी. पाटील, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, उमेश पाटील, बाबू कोले, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुहास हुद्दार, पत्रकार परिषद प्रतिनिधी शेखर पाटील, अर्जुन सांगावकर, उपस्थित होते.








