- लोकायुक्त पोलिसांकडून एकाचवेळी सात ठिकाणी छापे
- सोने-चांदी, एफडी, वाहनांसह मोठी स्थावर मालमत्ता जप्त
बेळगाव : बेळगाव जिल्हा नगरविकास कक्षातील सहायक कार्यकारी अभियंत्याच्या निवासस्थानासह विविध ठिकाणांवर लोकायुक्त पोलिसांनी एकाचवेळी छापे टाकत मोठी कारवाई केली असून सुमारे १४ कोटी रुपयांहून अधिकची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
लोकायुक्त पथकाने सहायक कार्यकारी अभियंता अजयसिंह बापसिंग राजपूत यांच्या बेळगाव शहरातील तीन घरे, एक कार्यालय आणि बँक लॉकर अशा एकूण सात ठिकाणी समन्वित पद्धतीने छापे टाकले. बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमवल्याच्या तक्रारीनंतर ही धडक कारवाई करण्यात आली.

प्राथमिक तपासात सौंदत्ती, हुक्केरी आणि हुबळी परिसरात मिळून सुमारे १८ स्थावर मालमत्तांची नोंद असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात संपत्ती आढळल्याने पथकही आश्चर्यचकित झाले.
या कारवाईत सुमारे ५ किलो ९६० ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे ५ किलो चांदीचे दागिने, तसेच ३ कोटी १२ लाख रुपयांची बँक मुदत ठेव (एफडी) जप्त करण्यात आली आहे. याशिवाय आलिशान कार आणि दुचाकी वाहनांचीही नोंद तपासात समोर आली आहे. लोकायुक्त पथकाने आतापर्यंत एकूण १४ कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता ताब्यात घेतली असून, उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकायुक्त अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून बँक लॉकर उघडल्यानंतर आणखी मोठे घबाड उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








