• शहापूर महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ, शहापूर यांनी ७ एप्रिल मंगळवार सायं. ५.०० वाजता साईगणेश सोसायटीच्या सभागृहात भव्य बैठक आयोजित केली. अध्यक्षस्थानी शहापूर महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव होते. यंदाचा पारंपारिक शिवजयंती उत्सव १९ एप्रिल रोजी पार पडणार असून, चित्ररथ मिरवणूक २१ एप्रिलला होणार आहे.

बैठकीत शिवजयंती उत्सवाच्या पारंपारिक थाटामाटात आयोजन करण्यासाठी विचारविनिमय करण्यात आला. अध्यक्ष नेताजी जाधव म्हणाले, “बेळगावच्या शिवजयंतीला १०७ वर्षांचा इतिहास असून, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून हजारो शिवभक्त या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी येतात. यावर्षीही उत्सव भव्यरित्या पार पडावा, यासाठी योग्य तयारी केली जाईल.”

यंदाचा कार्यक्रम १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी उद्यान, शहापूर येथे पूजन, तर २१ एप्रिल रोजी बॅ.नाथ पै चौक येथे पहिल्या चित्ररथाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येईल. शहापूर, अनगोळ आणि वडगाव भागातून येणाऱ्या चित्ररथांचे स्वागत महामंडळाकडून केले जाईल.

बैठकीत प्रशांत भातकांडे, श्रीकांत कदम, महादेव पाटील, पी.जी. घाडी, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू बिरजे, रणजीत हावळान यांसह इतरांनी आपले विचार मांडले.

यावेळी शहापूर महामंडळाच्या वतीने श्री. प्रकाश मरगाळे आणि श्री. अंकुश केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. दीपक दळवी यांच्या निधनानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदाची धुरा श्री. प्रकाश मरगाळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदावर अंकुश केसरकर यांची नियुक्ती झाली.

श्री. प्रकाश मरगाळे म्हणाले, “माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. सीमाप्रश्नासंदर्भातील घडामोडींवर लक्ष केंद्रित केले असून, शिवजयंतीनंतर मध्यवर्ती बैठकीत पुढील लढ्याची दिशा ठरवणार आहोत.”

अंकुश केसरकर म्हणाले, “माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. १०७ वर्षांची परंपरा लाभलेली शिवजयंती आपण सर्व मिळून भव्यदिव्य साजरी करूया. अध्यक्षपद सांभाळताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.”

यावेळी बैठकीला माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, अशोक चिंडक, महादेव पाटील,पी.जी. घाडी, हिरालाल चव्हाण, श्रीकांत प्रभू, श्रीधर जाधव, सचिन केळवेकर, रणजीत हवळणाचे,अभिजीत मजुकर,सुरज चव्हाण,मंगेश नागोजीचे, राजाराम सूर्यवंशी, अनिल आंबरोळे, बाबू कोले,शशिकांत सडेकर, एस.आर.चौगुले,शिवकुमार मनवाडकर जोतिबा मासेकर ,आदी उपस्थित होते प्रशांत भातकांडे यांनी आभार मानले.