• अवघ्या काही तासांत तीन संशयितांना अटक
  • पोलिसांनी उघडकीस आणला आरोपींचा बनाव
  • रिक्षा स्टँडवरील किरकोळ वादातून केला होता खून

कागवाड : बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यात मंगसुळी गावात रिक्षा स्टँडवर नंबर लावण्याच्या किरकोळ वादातून रिक्षाचालक अशोक वड्डर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी वेगवान कारवाई करत अवघ्या काही तासांत तीन संशयित आरोपींना अटक करून त्यांना हिंडलगा कारागृहात रवानगी केली.

मंगसुळी गावात रिक्षा उभी करण्याच्या कारणावरून भाऊबंदकीतील जुना वाद पुन्हा उफाळून आला होता. सागर संभाजी वड्डर, शिवा संभाजी वड्डर आणि विनोद संभाजी वड्डर यांनी अशोक वड्डर यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनीच पोलीस ठाण्यात जाऊन ‘भांडण सुरू आहे’ अशी खोटी माहिती दिल्याचे उघड झाले.

मृताच्या नातेवाईकांपूर्वीच आरोपी तक्रार देण्यासाठी पोहोचल्याने पोलिसांना संशय आला. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी करण्यात आली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रिक्षा नंबर लावण्यासारख्या शुल्लक कारणावरून तरुणाचा बळी गेल्याने कागवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी जलद गतीने तपास पूर्ण करत आरोपींना जेरबंद केल्याबद्दल पोलीस पथकाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.