• शहापूर पोलिसांची कारवाई ; ब्लॅकमेल करून लाखोंची फसवणूक

बेळगाव : सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार करून तिची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.

शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारात, ईश्वरसिंग प्रेमसिंग बडपुजे या तरुणाने २०१९ मध्ये इन्स्टाग्रामवरून एका तरुणीशी ओळख करून घेतली. ओळखीचे रूपांतर प्रेमात करत त्याने लग्नाचे आमिष दाखवले. या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने तरुणीवर अत्याचार केले आणि तिचे खासगी फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केले.

हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडित तरुणीकडून वारंवार पैशांची मागणी केली. यामध्ये तरुणीच्या वडिलांच्या मालमत्तेतून ८ लाख रुपये, एफडीमधील सुमारे ७ लाख रुपये रोख रक्कम तसेच सुमारे १५० ग्रॅम सोन्याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या छळानंतर पीडितेने पुराव्यासह शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल न करता राजीनाम्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही पीडित तरुणीने केला आहे.

दरम्यान, आरोपी ईश्वरसिंग याने तरुणीची फसवणूक केल्यानंतर त्याचे कुटुंबीय लग्नासाठी तब्बल ३ कोटी रुपयांची मागणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आरोपी सध्या आणखी एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. वकील मंदाकिनी अप्पुगोळ यांनीही आरोपीवर कठोर कारवाई करून पीडितेचे सुमारे १९ लाख रुपये परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ईश्वरसिंग प्रेमसिंग बडपुजे याला शहापूर पोलिसांनी सोमवारी अटक केली. पीडित तरुणीने पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेत तक्रार दिल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना तरुणींनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचावासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.