
येळ्ळूर : सीमाप्रश्न सोडवण्यासाठी आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने सुरू केलेल्या ‘लाखो सह्यांच्या मोहिमेला’ आता व्यापक लोकचळवळीचे रूप येत आहे. या उपक्रमाला येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने ठाम पाठिंबा जाहीर करत, ही मोहीम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून, बैठकीचे अध्यक्षस्थान विलास घाडी यांनी भूषवले.
बैठकीच्या सुरुवातीला गावातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीमावादाला नव्याने चालना देण्यासाठी आणि मराठी भाषिकांची एकजूट केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार संघाने ही स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून सीमाभागातील जनतेच्या भावना अधिकृतपणे मांडल्या जाणार आहेत.
सीमा चळवळीतील महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या येळ्ळूर गावाने नेहमीच अशा आंदोलनांत पुढाकार घेतला आहे. समितीच्या बैठकीत या मोहिमेचे स्वागत करत, “हा केवळ पत्रकारांचा उपक्रम नसून सीमाभागातील प्रत्येक नागरिकाच्या अस्तित्वाशी निगडित लढा आहे,” असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
या मोहिमेअंतर्गत येळ्ळूर व परिसरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या सह्या गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कार्यकर्त्यांसह तरुण पिढी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापरही केला जाणार आहे.
समितीने सर्व ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, ही मोहीम आपल्या भागात पोहोचल्यावर मतभेद विसरून ‘मराठी’ या भावनेतून एकत्र येत तिला यशस्वी करावे. पत्रकार संघाच्या या उपक्रमामुळे सीमाप्रश्नाला नव्या दृष्टीने चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, येळ्ळूरच्या पाठिंब्यामुळे मोहिमेला अधिक बळ मिळाले आहे.
या बैठकीला विलास घाडी, सतीश पाटील, शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, मनोहर पाटील, परशराम घाडी, शंकर टक्केकर, मल्लप्पा काकतिकर, तानाजी पाटील, महेश कुगजी, शुभम जाधव, आकाश नायकोजी, अमित मुचंडी, मदन धामणेकर, नागराज चांगळी, प्रसाद पाटील, भाऊराव मुंचंडीकर, योगेश कदम, अक्षय पाटील, राहुल कुगजी आदी उपस्थित होते.








