बेळगाव / प्रतिनिधी

दीपक दळवी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मंगळवारी पार पडलेल्या समितीच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी प्रकाश मरगाळे यांचे नाव एकमताने मान्य करण्यात आले. बैठकीत ठराव मांडून उपस्थित सर्व सदस्यांनी त्यांना अनुमोदन दिले.

प्रकाश मरगाळे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसह सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठी भरीव कार्य केले आहे. समितीच्या खजिनदार पदाची त्यांनी यशस्वीपणे धुरा सांभाळली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रकरणात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

मंगळवारी झालेल्या विशेष बैठकीत म.ए. समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्याहस्ते प्रकाश मरगाळे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.