बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असून, सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या एका तरुणाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.
छत्रपती शिवाजीनगर येथील दुसऱ्या चौकाजवळ संशयास्पद वर्तन करताना दिसलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सिद्धार्थ दत्ता कदम (वय २३, रा. शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याची चौकशी केली.
चौकशीदरम्यान त्याने अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला बीआयएमएस रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत त्याने गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यात तत्परता दाखवणाऱ्या हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ मालगी आणि शंकर कुगलोल यांच्या कार्याचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.








