- बॉम्बशोध पथक आणि सीसीटीव्हींची करडी नजर
कोल्हापूर : वाडीरत्नागिरी (ता. पन्हाळा) येथे होणाऱ्या श्रीक्षेत्र जोतिबा यात्रेसाठी सुमारे १५०० पोलिस तैनात केले जात आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने संपूर्ण बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण केले असून, तयारी अंतिम टप्प्यावर आहे.
चैत्र यात्रेच्या दरम्यान महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशातून लाखो भाविक वाडीरत्नागिरी येथे येतात. अंदाजे ४ ते ५ लाख भाविक यात्रेदरम्यान डोंगरावर पोहोचतात. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने जोतिबा डोंगरावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सोमवारी (दि. ३०) सकाळी पोलिसांचे वाटप केले जाईल आणि बुधवारी (दि. १) यात्रा संपेपर्यंत हा बंदोबस्त कायम राहील.
यात्रेसाठी जिल्ह्यातील ८८५ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत, तसेच परिक्षेत्रातून ४३६ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी अतिरिक्तपणे सहभागी आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्बशोध पथक आणि सीसीटीव्हींचीही कडेकोट तपासणी होणार आहे. दोन बॉम्ब शोध व नाशक पथक परिसरातील आणि पार्किंगच्या ठिकाणांची नियमितपणे, प्रत्येक तीन ते चार तासांनी, तपासणी करतील. देवस्थान समितीने यात्रेच्या सुरक्षेसाठी १०० हून अधिक सीसीटीव्ही बसविले आहेत.







