• पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

“आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहणे आपल्या सजगतेवर अवलंबून आहे. कोणत्याही आमिष किंवा भीतीला बळी न पडता, ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहावे,” असे आवाहन बेळगाव पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे (IPS) यांनी केले.

शनिवारी, २८ मार्च रोजी टिळकवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या श्री सामर्थ्य मंदिर हॉल येथे ‘बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ’ आणि ‘बेळगाव शहर सायबर क्राईम विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राईम जनजागृती सभा आयोजित केली होती. या कार्यक्रमात पोलीस आयुक्तांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

पोलीस आयुक्तांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार जसे की ओटीपी फ्रॉड, डिजिटल अरेस्टची भीती, लॉटरी स्कॅम आणि बनावट केवायसी अपडेट्स याबाबत सोप्या भाषेत माहिती दिली. त्यांनी संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, तसेच सुरक्षिततेचे नियम पाळा, असे आवाहन केले. याशिवाय, पीएसआय सुमन पवार यांनी तांत्रिक सुरक्षिततेसंदर्भातील मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात मानद सचिव श्री. सुरेंद्र देसाई यांच्या स्वागत भाषणाने झाली, तर एसीपी (सायबर क्राईम) श्री. मंतूर यांनी प्रास्ताविक केले. संघाचे अध्यक्ष श्री. विश्वास धुराजी यांनी पोलीस आयुक्त व इतर अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. या वेळी मीडिया पॉवर प्रेसचे मालक श्री. संदीप देसाई यांनी पोलीस आयुक्तांचा विशेष सत्कार केला.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून वरिष्ठ पत्रकार श्री. प्रसाद प्रभू यांनी सायबर गुन्हेगारीची सद्यस्थिती व ज्येष्ठांनी घ्यावयाची खबरदारी यावर मार्गदर्शन केले. एसीपी (सायबर क्राईम) श्री. मंतूर, सायबर क्राईम पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी, व टिळकवाडी पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय पीआरओ श्री. विकास कलघटगी यांनी केले, तर संघाचे अध्यक्ष श्री. विश्वास धुराजी यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी मोबाईल बँकिंग व सायबर सुरक्षा बाबत प्रश्न विचारले. पोलीस आयुक्तांनी सर्व शंकांचे निरसन केले. मानद सह-सचिव श्री. शिवराज पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. चहा व अल्पोपहारानंतर सभा यशस्वीपणे संपली.