- ८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान
पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे २०२६ सालासाठीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आळंदी संस्थानची बैठक पार पडली असून, यावेळी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती सादर करण्यात आली.
पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून, २४ जुलै रोजी ती पंढरपूर येथे पोहोचेल. प्रस्थानाची वेळ दुपारी ३ वाजता ठेवण्यात आली आहे. या कालावधीत १७ दिवसांचे मुक्काम, ४ गोल रिंगण आणि ३ उभे रिंगण पार पडणार आहेत. तसेच आषाढी एकादशी २५ जुलै रोजी साजरी होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे हजारो वारकरी ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. जसे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहतो, त्याचप्रमाणे वारकऱ्यांनाही आषाढी यात्रेची ओढ लागलेली असते. चैत्र दशमीपासूनच वारीच्या नियोजनासाठी आळंदी देवस्थानमध्ये बैठका घेतल्या जातात. या बैठकीला संस्थेचे विश्वस्त आणि दिंडी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- पालखी सोहळ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
८ जुलै (ज्येष्ठ वद्य अष्टमी) : आळंदी येथून प्रस्थान
९ व १० जुलै : पुणे मुक्काम
११ व १२ जुलै : सासवड मुक्काम
१३ जुलै : जेजुरी
१४ जुलै : वाल्हे मुक्काम
१५ जुलै : नीरा येथे स्नान, नंतर लोणंद मुक्काम
१६ जुलै : चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण, तरडगाव मुक्काम
१७ जुलै : फलटण मुक्काम
१८ जुलै : बरड मुक्काम
१९ जुलै : नातेपुते मुक्काम
२० जुलै : पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण, माळशिरस मुक्काम
२१ जुलै : खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण, वेळापूर मुक्काम
२२ जुलै : ठाकुरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण, टप्पा येथे बंधू भेट, भंडीशेगाव मुक्काम
२३ जुलै : बाजीराव विहीर येथे गोल व उभे रिंगण, वाखरी मुक्काम
२४ जुलै : आषाढ दशमी, पंढरपूर येथे आगमन व मुक्काम
२५ जुलै : आषाढी एकादशी सोहळा
बैठकी दरम्यान वारीदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी शासनस्तरावर मांडून त्यांचे निराकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, भाविकांमध्ये पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.








