बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात मार्केट पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी एका ४० वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून सुमारे ९.२७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर येथील रहिवासी ललिता प्रकाश ममदापूर यांनी ९ मार्च २०२६ रोजी तक्रार नोंदवली होती. त्यांच्या घरातून २६ डिसेंबर २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दागिने चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद होते.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित सुरेखा बसवराज तळवार (रा. उप्पार गल्ली, खासबाग) हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरीची कबुली दिली. आरोपीकडून ६८.७४ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ९ लाख २७ हजार ९९० रुपये इतकी आहे.
ही कारवाई निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पीएसआय हुसेन केरूर, विठ्ठल हावन्नवर, एएसआय एस. एम. शिंदे यांचा समावेश होता. त्यांच्या या कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी विशेष कौतुक केले आहे.








