- अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नगरसेवकांची टीका
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महानगरपालिकेच्या कर वसुलीविषयक विशेष सभेत आज नगरसेवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. दरम्यान, कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी १ एप्रिलपासून नवीन सॉफ्टवेअर प्रणाली लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
महापौर प्रीती कामत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नगरसेवक रवी साळुंखे यांनी ‘कर्नाटक वन’ केंद्रांमधील गैरव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. नागरिक कर भरण्यास तयार असतानाही तांत्रिक कारणे देत त्यांना परत पाठवले जात असल्याची तक्रार त्यांनी केली. या मुद्द्याला नगरसेवक शाहीद खान पठाण यांनीही समर्थन दिले.
नगरसेवक मुजम्मिल ढोणी यांनी जयकिसान भाजी मार्केटच्या कराचा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाने ३४ लाख रुपयांचा कर स्वीकारण्यास नकार दिल्याचे सांगितले. महसूल उपायुक्तांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अडचणी येत असल्याचे स्पष्ट केले. उपमहापौर हनुमंत कोंगाली यांनी अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेने काम करण्याचे निर्देश दिले.
महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी माहिती दिली की, सुमारे १९ कोटी रुपयांचा कर थकीत असून केवळ ७० टक्के वसुली झाली आहे. अधिकाधिक वसुलीसाठी अधिकारी सक्रिय राहावेत, असे त्यांनी सांगितले. माजी महापौर मंगेश पवार यांनी मालमत्तांची मोजणी करून कराबाबत स्पष्टता देण्याची गरज व्यक्त केली.
महसूल उपायुक्त सिद्धू हुल्लोळी यांनी १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन ई-प्रणालीची माहिती देताना, मोबाईलवर संदेशाद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. चुकीच्या पद्धतीने मालमत्ता नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शंकर पाटील यांनी केली.
या बैठकीला सभागृह नेते संतोष पेडणेकर, नगरसेविका रेखा हुगार, उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते.








