बेळगाव / प्रतिनिधी
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील यांची भेट घेऊन सीमाप्रश्न व मराठी जनतेच्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार रविवारी या पत्राची प्रत समितीच्या वतीने प्रकाश मरगाळे यांनी जयंतराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
यानंतर आमदार जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्राची प्रत सादर केली. तसेच सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित दावा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी जनतेच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी तज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची बैठक लवकरात लवकर घेण्यात यावी, तसेच त्या बैठकीस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करावे, अशी विनंती करण्यात आली. यावर अधिवेशन संपल्यानंतर बैठक बोलावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दरम्यान, कै. दीपक दळवी यांच्या निवासस्थानी जयंतराव पाटील यांनी भेट दिली असता समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.








