बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा पोलिसांनी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीला गेलेले ५१ मोबाईल शोधण्यात यश मिळवले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी आज स्वतः मोबाईल मालकांना त्यांचे संच सुपूर्द केले असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, हस्तगत केलेल्या मोबाईलमध्ये की-पॅड फोनसह महागडे स्मार्टफोन यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४७४४ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी १०५१ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले गेले आहेत.

अथणी, रामदुर्ग, बैलहोंगल भागातील जत्रा आणि बसस्थानकांवर मोबाईल हरवलेल्या नागरिकांनी केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलवर तक्रारी नोंदवल्या होत्या. या मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड टाकताच सायबर पोलिसांना त्याची माहिती मिळाली आणि तातडीने संबंधित क्रमांकांवर संपर्क साधून मोबाईल जप्त करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल हरवल्यास त्वरित तक्रार नोंदवावी, जेणेकरून या हायटेक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल.