- मृताच्या पत्नीची पोलिसात तक्रार ; आरोपी मोठ्या भावाला अटक
- नुग्गनट्टी गावातील हृदयद्रावक घटना
बेळगाव : मुरगोड तालुक्यातील नुग्गनट्टी गावात शेतातील पाण्याच्या वाटपावरून झालेल्या भांडणामुळे शनिवारी हृदयद्रावक घटना घडली. ४५ वर्षीय यल्लाप्पा देमप्पा सन्नम्मावर याचा मोठा भाऊ महादेवाप्पा सन्नम्मावर याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात यल्लाप्पाचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, यल्लाप्पा आणि महादेवाप्पा यांच्यात सिंचनाच्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद सुरु होता. वाद विकोपाला गेल्यानंतर महादेवाप्पाने यल्लाप्पावर प्राणघातक हल्ला केला. अचानक घडलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यल्लाप्पाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलीसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. मृताच्या पत्नीच्या तक्रारीनंतर महादेवाप्पाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.








