गोकाक / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात शॉर्ट सर्किटमुळे एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत गंगाधर गुडगुडी गंभीररित्या जखमी झाले, परंतु अग्निशमन दलाच्या तात्काळ बचावकार्यामुळे जीवितहानी टळली.

शहरातील लँडमार्कजवळील एका घरात ही घटना घडली. घरात अचानक विद्युत शॉर्ट सर्किट होऊन आग घरभर पसरली. मात्र ज्वाळांमध्ये सापडलेल्या गंगाधर यांची अग्निशमन दलाने तत्काळ सुटका केली.

जखमी गंगाधर यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोकाक शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपास केला आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग शेजारच्या घरांपर्यंत पसरण्यापासून रोखली गेली. या प्रकरणाची नोंद गोकाक शहर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.