• शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे ‘कवी समजून घेताना’ उपक्रमाचे पाचवे पुष्प गुंफले

बेळगाव : कवी हा केवळ शब्दांचा कारागीर नसतो, तर तो आपल्या काळाचा साक्षीदार असतो. त्याच्या भोवती घडणाऱ्या घटना, समाजातील चढ-उतार, माणसांच्या भावना आणि जगण्यातील सूक्ष्म छटा यांचे प्रतिबिंब त्याच्या शब्दांत उमटत असते. कवीच्या नजरेत असलेली स्वप्ने, संवेदनशीलता आणि अनुभवांची शिदोरी यामुळे तो आयुष्याचे अनेक पैलू सहज, ओघवत्या आणि प्रभावी शैलीत मांडतो, असे हृदयस्पर्शी प्रतिपादन कवी सुधाकर गावडे यांनी केले.
शब्दगंध कवी मंडळ यांच्या वतीने शनिवार, दि. २१ रोजी मराठी विद्या निकेतन, बेळगाव येथे आयोजित “कवी समजून घेताना” या उपक्रमाच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उबदार आणि स्नेहपूर्ण वातावरणात झाली. मंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमामागील हेतू स्पष्ट करत, कवी आणि काव्य यांच्यातील नात्याची सुंदर उकल केली. त्यांनी कवी सुधाकर गावडे यांच्या साहित्य प्रवासाचा परिचय करून देत उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले.

यावेळी ज्येष्ठ कवी सुभाष सुंठणकर यांच्या हस्ते कवी गावडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा क्षण उपस्थितांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.

आपल्या मनोगतात कवी गावडे यांनी अत्यंत साध्या, पण भावगर्भ शब्दांत आपल्या काव्यप्रवासाची दारे उघडली. “जन्मली आईच्या जात्यात माझ्या, कविता म्हणून कदाचित आली असावी नात्यात माझ्या…” या ओळींमधून त्यांनी कविता ही आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग असल्याचे सूचित करत कार्यक्रमाची सुरुवात केली.

कवी गावडे यांच्या कवितांमध्ये ग्रामीण जीवनाचा सुगंध, आईच्या ममतेची ऊब, निसर्गाचे कोमल आणि कठोर रूप, शेतीची कष्टमय वाटचाल, तसेच बदलत्या काळातील पिढ्यांमधील दुरावा आणि वेदना यांचे अत्यंत जिवंत चित्रण अनुभवायला मिळाले. त्यांच्या शब्दांतून उमटणारी संवेदना आणि वास्तवाचा स्पर्श श्रोत्यांच्या मनाला भिडत होता.

“कविता काय असते”, “चिंदबर महास्वामी”, “या वेड्यांना कसे कळावे”, “त्या पिढ्यांचे या पिढ्यांना दुःख”, “पाऊस”, “शेती”, “चर्चा” अशा विविध विषयांवरील त्यांच्या कवितांनी सामाजिक जाणिवा, तत्त्वचिंतन आणि जीवनाचे तत्त्वज्ञान यांचा सुंदर संगम घडवला. गझल, चारोळी, अभंग आणि विडंबन काव्य या विविध काव्यप्रकारांतून त्यांनी आपली अभिव्यक्ती बहुरंगी पद्धतीने साकारली आणि उपस्थित काव्यरसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उपस्थित कवींनीही आपल्या भावविश्वाचे रंग उधळले. “मर्म”, “विचारांची गर्दी”, “सुसाईड नोट”, “आयुष्य”, “भावना”, “सावित्रीच्या लेकी”, “माझी सखी”, “भरपूर हसा”, “खुशीत घे गं आई”, “आई”, “कॉलेज लाईफ”, “आठवत नाही”, “पैसा बोलतो”, “जिंदगीत काय पाहिजे” अशा विविध विषयांवरील कवितांनी सामाजिक वास्तव, वैयक्तिक अनुभव आणि भावनांचे विविध पैलू प्रभावीपणे उभे केले.

या सत्रात बसवंत शहापूरकर, चंद्रशेखर गायकवाड, गुरुनाथ किरमटे, प्रा. संजय बंड, अॅड. नितीन आनंदाचे, अशोक सुतार, डॉ. प्रेमा मेणशी, स्मिता किल्लेकर, प्रा. शुभदा खानोलकर, मधू पाटील, निळूभाऊ नार्वेकर, दामोदर मुळीक, सतीश जुटेकर, जोतिबा नागवेकर, आनंद मेणशी, जितेंद्र रेडेकर, सीमा कणबरकर, परशराम खेमणे यांच्यासह अनेक कवी आणि काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, या कार्यक्रमाने काव्य, विचार, संवेदना आणि समाजभान यांचा सुरेख संगम घडवून आणत उपस्थितांना एक समृद्ध, प्रेरणादायी आणि मनःस्पर्शी अनुभव दिला. कवीला समजून घेण्याचा हा प्रयत्न काव्यप्रेमींच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील, यात शंका नाही.