• अंजुमन ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद (ईद-उल-फित्र) उत्साहात साजरा केला. शहरातील अंजुमन ईदगाह मैदानावर आज सकाळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमले आणि सामूहिक नमाज अदा केली. आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी नमाजानंतर उपस्थितांना तसेच संपूर्ण शहरवासीयांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

रमजान महिन्यात कडक उपवास करून धार्मिक कर्तव्य पार पाडलेल्या बांधवांनी आज ‘मीठी ईद’ निमित्त आनंद, बंधुत्व आणि दानाचा संदेश देत सण साजरा केला. उपस्थित आबालवृद्ध सर्वांनी पारंपरिक पोशाख, नवीन कपडे व टोप्या घालून नमाज अदा केली.

सामूहिक नमाज संपल्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना गळाभेट देऊन ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. आमदार सेठ यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांशी संवाद साधत त्यांच्या भावनांचा आदर व्यक्त केला आणि सर्व शहरवासीयांना शांतता, सौहार्द आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.

युवा नेते अमान सेठ यांनीही सर्व समाजबांधवांचा सहभाग असल्याचे सांगत एकात्मतेचा संदेश दिला. “आपण सर्वजण एकत्र येऊन सण साजरे करतो, हेच आपल्या समाजाचे खरे सामर्थ्य आहे,” असे त्यांनी नमूद केले.

अंजुमन ईदगाह मैदानावर उत्साहपूर्ण वातावरण असून बालगोपाळांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. शहरभर शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात ईद-उल-फित्र साजरा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.