
बेळगाव / प्रतिनिधी
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांच्या कुटुंबीयांची आज शुक्रवारी महाराष्ट्राचे माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपले आयुष्य वेचणारे आणि झुंजार व्यक्तिमत्त्व असलेले अध्यक्ष दीपक दळवी यांचे गेल्या मंगळवारी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सीमा भागात शोककळा पसरली होती. त्यावेळी महाराष्ट्रातून अनेक आजी-माजी मंत्री, आमदार-खासदारांनी शोकसंदेश पाठवून आपले दुःख व्यक्त केले.
या पार्श्वभूमीवर माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज थेट बेळगाव गाठून सावरकर रोड, टिळकवाडी येथील दळवी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रथम दिवंगत दीपक दळवी यांच्या प्रतिमेला नमन करून आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी दिवंगतांच्या शेवटच्या क्षणांबद्दल माहिती जाणून घेऊन कुटुंबीयांची विचारपूस केली व त्यांचे सांत्वन केले.
याप्रसंगी दळवी कुटुंबीयांसह चिरंजीव बुलंद दळवी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, युवा नेते शुभम शेळके, धनंजय पाटील, अंकुश केसरकर, चंद्रकांत कोंडुस्कर, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, अमित देसाई, किरण हुद्दार यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दळवी कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माजी मंत्री जयंत पाटील यांनी समितीच्या नेतेमंडळींशी चर्चा केली. यावेळी उपस्थितांनी बेळगावसह सीमाभागातील सद्यस्थितीची माहिती दिली. तसेच, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सीमा भागातील घडामोडींबाबत चर्चा होणार असून, लवकरच समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणू, असे आश्वासन त्यांनी दिले.








