• एकाला अटक ; सीमाभागातून होणाऱ्या पुरवठ्याचा उलगडा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील जैतनमाळ येथे गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक किलोपेक्षा अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमाभागातून गांजा आणून बेळगावमध्ये विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जैतनमाळ येथील सार्वजनिक ठिकाणी छापा टाकून पिरनवाडी येथील मानस मनोहर कदम याला ताब्यात घेतले. मात्र या कारवाईदरम्यान रितिक पाटील हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून सुमारे ५५ हजार रुपये किमतीचा १ किलो १०० ग्रॅम गांजा, डिजिटल वजन काटा आणि मोबाईल असा एकूण ६३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा गांजा मध्यप्रदेशातील सुनील नावाच्या व्यक्तीकडून पुरवला जात असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे.